
लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)। लातूर शहरातील झपाट्याने वाढणारी वाहनसंख्या, वाढते शहरीकरण आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करून शहरातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
६ ठिकाणी नवीन सिग्नल बसणार
शहरातील रिंग रोड परिसर आता मुख्य वाहतुकीचा केंद्रबिंदू बनल्याने अपघात आणि कोंडी वाढली आहे. यावर उपाय म्हणून खालील सहा ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्यात येणार आहेत:
छत्रपती चौक (वाडा हॉटेल परिसर)
नाईक चौक
कन्हेरी चौक
महात्मा बसवेश्वर चौक
बाभळगाव नाका
गरुड चौक
याशिवाय, शहरातील विद्यमान १८ सिग्नलपैकी काही सिग्नल बंद अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ ‘येलो ब्लिंकिंग’ सुरू आहे. त्यामुळे नव्या सिग्नलमुळे वाहतुकीत अधिक नियंत्रण अपेक्षित आहे.
---
नो-पार्किंग झोन आणि पार्किंगची नवी व्यवस्था
शहरातील मुख्य १८ चौकांच्या ५० मीटर परिसरात ‘नो-पार्किंग’ आणि ‘नो-स्टॉपिंग’ झोन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चौकांमधील अडथळे कमी होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी खालील ठिकाणी अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:
अण्णाभाऊ साठे चौकाजवळील मनपाची मोकळी जागा (गंजगोलाई परिसर)
जुन्या गुळ मार्केट परिसरातील रेल्वे लाईनलगतची जागा
गांधी मार्केट पूर्व बाजू
छत्रपती शिवाजी महाराज चौक उड्डाणपुलाखाली दुचाकी पार्किंग
---
अवजड वाहनांना वेळेची मर्यादा
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत मुख्य मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई आणि शाहू चौक यांसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
---
खाजगी ट्रॅव्हल्सना शहरात प्रवेशबंदी
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रिंग रोडलगत स्वतंत्र थांबे निश्चित करण्यात आले असून, औसा रोडवरील राजीव गांधी चौक परिसरात ट्रॅव्हल्स थांबा प्रस्तावित आहे.
---
टॅक्सी आणि सहा आसनी वाहनांसाठी नवीन थांबे
बाहेरगावाहून येणाऱ्या टॅक्सी व सहा आसनी वाहनांसाठी खालील ठिकाणी अधिकृत थांबे निश्चित करण्यात आले आहेत:
औसा रोड – साईसृष्टी नर्सरी समोर
बार्शी रोड – माही टायर्स, पीव्हीआर चौक
नांदेड रोड – मैत्री लंच होम समोर, गरुड चौक
---
हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत
हा जाहीरनामा १५ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नियमांबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत पोलीस प्रशासनाकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. प्राप्त हरकतींची सुनावणी करून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
---
वाहतूक शिस्तीवर भर
या बदलांमुळे लातूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहकार्य हा या योजनेच्या यशाचा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis