
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका आरोग्य विभागाने आज सकाळी चिपळूण शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत आरोग्य कर्मचारी, अशा सेविका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातून सुरू झाली. ती चिपळूण पालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
यावेळी इक्बाल चौगुले यांनी अभियानाविषयी प्रास्ताविक करत उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यानंतर डॉ. ज्योती यादव यांनी ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, विविध आरोग्य सुविधा वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदर यांनीही अभियानाची सविस्तर माहिती देत नागरिकांनी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन केले.
यावेळी डॉ. अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश वाघुळदे, हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जनजागृती फेरीमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, तसेच संजीवनी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्याबाबत जनजागृती करणारे फलक आणि घोषवाक्यांद्वारे नागरिकांना संदेश देण्यात आला.
या अभियानांतर्गत कॅन्सर तपासणीसाठी विशेष व्हॅन विविध भागांत फिरत असून, या फेरीमध्येही त्या व्हॅनचा सहभाग होता. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी