'वन पुणे कार्ड’मुळे एकाच तिकिटावर दोन्ही मेट्रोचा प्रवास
पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पुणेरी मेट्रो आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉ
Metro Train


पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पुणेरी मेट्रो आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) मेट्रोमधून एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यासाठीची एकत्र तिकीट प्रणालीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होऊपर्यंत या तिकीट प्रणालीचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महामेट्रोकडून सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. आता पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मे महिन्यात पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून, उर्वरित मार्ग जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हिंजवडी मेट्रो शिवाजीनगरपर्यंत आल्यानंतर ती जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे. यासाठी पादचारी पुलाचे काम वेगात सुरू असून, दोन्ही मेट्रो मार्गांमध्ये सुलभ बदल (इंटरचेंज) करता येणार आहे.मेट्रो आणि बसचे प्रवास सोयीचे व्हावे यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेलाही या प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मेट्रोसाठी फिडर सेवा वाढविण्यावरही भर देण्यात आला. ‘वन पुणे कार्ड’च्या माध्यमातून मेट्रो आणि बस या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवांचा एकत्रित वापर सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande