अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) राज्यातील शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 11 वी (अकरावी) प्रवेशाची केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरून नोंदणी करण्याची
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 10 एप्रिलपासून भाग-1 अर्ज भरण्यास प्रारंभ


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)

राज्यातील शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 11 वी (अकरावी) प्रवेशाची केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग-2 भरण्याची सुविधा सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ उपक्रमांतर्गत राज्यभर अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत व ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गतवर्षी ही प्रणाली प्रथमच राबविण्यात आली होती. सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला असला, तरी यंदा प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडावी यासाठी राज्य मंडळाने पूर्वतयारी केली आहे.विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. राज्य मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. इतर मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही याच पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि निश्चित निकषांवर आधारित असणार असून, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत ती सुरू राहणार आहे. ऑनलाईन प्रणालीशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संकेतस्थळावर विविध महाविद्यालयांची माहिती, उपलब्ध शाखा, माध्यम, प्रवेश क्षमता आणि रिक्त जागांचा तपशीलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अर्ज नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा 8530955564 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande