नांदेड - महावितरणच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे आदेश
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.) - महावितरणच्या नांदेड परिमंडलातील अधिकारी व सर्व अभियंत्यांची नांदेड येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीस मुख्य अभियंता राजाराम माने तसेच मुख्यालयातून निरीक्षक म्हणून आलेले वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बांद्रे यां
नांदेड - महावितरणच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे आदेश


नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.) - महावितरणच्या नांदेड परिमंडलातील अधिकारी व सर्व अभियंत्यांची नांदेड येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीस मुख्य अभियंता राजाराम माने तसेच मुख्यालयातून निरीक्षक म्हणून आलेले वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत पावसाळ्यात सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा राखण्यासाठी वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वादळवाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांना अधिकाधिक काळ अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार देखभाल व दुरुस्ती कामांसाठी एजन्सीची नेमणूक करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. या बैठकीस नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते तसेच चाचणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, परिमंडलात देखभाल व दुरुस्तीच्या कामांना सुरवात झाली. त्यास अधिक गती देण्यात येत आहे. या मध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, रोहित्र व फीडर इन्सुलेटर्स बदलणे, अर्थिंग तपासणी, ऑइल फिल्टरेशन व टॉप-अप, वितरण पेट्यांची दुरुस्ती, नादुरुस्त लाइटनिंग अरेस्टर बदलणे, वीज खांब व तारांचे मजबुतीकरण, लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती, गंजलेले खांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फीडर पिलरची स्वच्छता व इन्सुलेशन स्प्रे, तसेच उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय उपकेंद्रांतील ब्रेकर्स दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप यांसारख्या कामांनाही वेग देण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण वीज यंत्रणा सज्ज करण्यावर भर देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande