
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis