परभणीत 17 एप्रिल रोजी अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत कवी संमेलन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। स्मशानभूमी आणि त्यात अमावस्येची रात्र म्हटले की सर्वसामान्यांच्या मनात भीती, भुताखेतांच्या गोष्टी आणि अंगावर काटा आणणारे विचार उभे राहतात. मात्र या पारंपरिक समजुतींना छेद देत परभणीजवळील स्वच्छ व सुंदर स्मशानभू
परभणीत 17 एप्रिल रोजी अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत कवी संमेलन व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।

स्मशानभूमी आणि त्यात अमावस्येची रात्र म्हटले की सर्वसामान्यांच्या मनात भीती, भुताखेतांच्या गोष्टी आणि अंगावर काटा आणणारे विचार उभे राहतात. मात्र या पारंपरिक समजुतींना छेद देत परभणीजवळील स्वच्छ व सुंदर स्मशानभूमीत एक अनोखा आणि वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कृषिभूषण कांतराव झरीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बहुचर्चित स्मशानभूमीत शुक्रवार 17 एप्रिल रोजी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता कवी संमेलन आणि चमत्कारांच्या प्रयोगांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.

या स्मशानभूमीत यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या सहली, डोहाळे जेवण तसेच झेंडावंदन यांसारखे उपक्रम नियमितपणे पार पडत असून, या उपक्रमामुळे स्मशानभूमीविषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी उभारण्याची चळवळ वेग घेत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादू आणि चमत्कारांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते प्रसन्ना भावसार व त्यांची टीम हे प्रयोग सादर करणार असून, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्ह्यातील निवडक कवी सहभागी होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande