
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.) - नांदेड परिसरातील शिवरोड सन्मान कॉलनी, खंडोबा चौक, देशमुखनगरी, मुळेनगरी, शिव गणेशनगर, देशमुख सिटी या भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडीच ते तीन तास उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. रात्रीच्या वेळी उष्णतेचा त्रास वाढलेला असताना वीज गेल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची गैरसोय झाली.
मंगळवारी सायंकाळनंतर काही काळ वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र, रात्री उशिरा वीज गायब झाली. सुरवातीला काही मिनिटांत वीज येईल अशी अपेक्षा होती; परंतु अडीच तास वीज न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. उष्णतेमुळे घरामध्ये राहणे कठीण झाले होते. अनेकांनी उघड्यावर बसून वेळ काढला.
महावितरण विभागाने अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले, तरी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis