
पुणे, 16 एप्रिल, (हिं.स.)। शहरात तीव्र उन्हाळा जाणवत असून, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेशी संबंधित थकवा, निर्जलीकरण, ताप, चक्कर येणे अशा त्रासांच्या झळाही पुणेकरांना बसत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये ७००हून अधिक नागरिकांवर उपचार करण्यात आले असून, उष्माघाताच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.
महापालिकेची १९ प्रसूतिगृहे व रुग्णालये, तर १३५ दवाखान्यांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या विविध तक्रारींसाठी हे ७७० रुग्ण महिनाभरात दाखल झाले. यामध्ये थकवा, निर्जलीकरण, त्वचेवरील पुरळ, पाय-हाताचे स्नायू अचानक घट्ट होणे (आकडी) आणि चक्कर येणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तसेच एका उष्माघाताच्या रुग्णाचेदेखील निदान झाले आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये गंभीर रुग्णांसाठी विशेष उपचार सुविधा, शीत कक्ष उभारण्याचे नियोजन असून, खासगी रुग्णालयांना गंभीर प्रकरणांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. नागरिकांनी दुपारी ११ ते चार या वेळेत उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके, सैल कपडे वापरावे, तसेच उष्णताविषयक लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु