
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)।
कन्नड तालुक्यातील
करंजखेड येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात परराज्यातील मल्लांनी हजेरी लावली होती. चुरशीच्या लढतीत पंजाबच्या सैफ अली दया याने हरियाणाच्या पैलवानाचा पराभव करत मानाची चांदीची गदा पटकावली.
कुस्त्यांच्या आखाड्याला सुरुवात झाली. सुरुवातीला स्थानिक परिसरातील मल्लांच्या ५० ते ५०० रुपयांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, जालना आणि नाशिक येथील
नामांकित पैलवानांनी आखाड्यात प्रवेश केल्यावर कुस्त्यांमध्ये खरी रंगत आली. पंजाब आणि हरियाणातील मल्लांच्या उपस्थितीमुळे आखाड्याची चर्चा पंचक्रोशीत होती.
आखाड्यातील शेवटची व मानाची कुस्ती पंजाबचा सैफ अली दया आणि हरियाणाचा पवन खेडकर यांच्यात झाली. पैलवानांनी दोन्ही एकमेकांचे डावपेच उलटवून लावल्याने ही कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली. अखेर सैफ अली दया याने चित्तथरारक खेळ करत पवन खेडकर याला आसमान दाखवले. विजेत्या मल्लास १२ हजार ५०० रुपये रोख आणि मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कुस्ती आखाडा समिती, यात्रा कमिटी आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व यशस्वी पैलवानांचा सत्कार करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis