पुणे - सात अनधिकृत आरएमसी प्रकल्प महापालिकेने केले जमीनदोस्त
पुणे, 16 एप्रिल, (हिं.स.)। पुणे शहराच्या विविध भागांत बेकायदा सुरू असलेल्या ‘रेडी मिक्स क्राँक्रिट’ (आरएमसी) प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लोहगाव, लोहगाव खांद
pmc


पुणे, 16 एप्रिल, (हिं.स.)। पुणे शहराच्या विविध भागांत बेकायदा सुरू असलेल्या ‘रेडी मिक्स क्राँक्रिट’ (आरएमसी) प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लोहगाव, लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील सात अनधिकृत आरएमसी प्रकल्प महापालिकेने जमीनदोस्त केले. महापालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.

अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील ७ अनधिकृत आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करून ते पाडण्यात आले. या कारवाई मध्ये या भागातील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविकेच्या पतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न जुमानता महापालिकेने आरएमसी प्रकल्पावर कारवाई केली. बेकायदा आरएमसी प्रकल्पावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक लोहगाव येथे आले आहे. ही माहिती समजताच या भागातील भाजपच्या नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर त्यांची बाचाबाची झाली. प्रीतम अंगावर धावून गेल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अतिक्रमण विभागाच्या पिंजरा गाडीतून पोलीस स्टेशनला नेले. यानंतर आरएमसी प्रकल्पांवर ही कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande