
नांदेड, 16 एप्रिल (हिं.स.)। केसरी मुलींमध्ये होणारा गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून भारतीय जनता पक्ष, लायन्स क्लब, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दि. १७एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवशक्तीनगर, नांदेड येथे पार पडणार असल्याची माहिती धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व अॅड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम ही मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या
प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
या मोहिमेत विशेषतः १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे न झालेल्या मुलींना प्राधान्य देण्यात आले असून त्यांना गार्डासिल-४ ही लस मोफत दिली जात आहे. ही लस एचपीव्ही चे प्रकार १६ आणि १८ पासून संरक्षण देते, जे गर्भाशयाच्या कर्करोगासाठी सुमारे ७० टक्के जबाबदार मानले जातात. या लसीचा एकच डोस देण्यात येतो आणि तो पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis