
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटा किर्लोस्कर मोटार यांच्या “शिका आणि कमवा” उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निवड शिबिर दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी उमेदवारांचे वय १८ ते २१ वर्ष दरम्यान असावे. उमेदवार किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराची उंची किमान ५ फूट व वजन किमान ४० किलो असणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक असून वैवाहिक स्थिती अविवाहित असावी.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम वर्षासाठी दरमहा रुपये १५,८१५ व द्वितीय वर्षासाठी रुपये १७,६१५ इतके मानधन देण्यात येणार आहे. दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणार्थी कालावधीसाठी पात्रता प्राप्त होईल. तसेच प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
या उपक्रमांतर्गत वाहन वेल्ड तंत्रज्ञ, वाहन रंगकाम तंत्रज्ञ, वाहन जोडणी तंत्रज्ञ व यांत्र-विद्युत तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी मूलभूत सुविधांसह राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या निवड शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis