
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।
परभणी शहरातील सुजाता नगर परिसरात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंढे यांच्या घरावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विलास बनसोडे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणावरून गौतम मुंढे आणि विलास बनसोडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद त्यानंतर वाढत गेला. बनसोडे यांनी मुंढे यांच्या घरासमोर येऊन पिस्तुलातून पाच फेर्या झाडल्या. या गोळीबारात घराच्या भिंती व काचांना नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित विलास रतन बनसोडे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास नानलपेठ पोलिस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis