
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील 735 झोपडी धारकांसाठी साडेतीन एकरात झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 16 लाखांची सदनिका त्यांना मोफत मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी शहर झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक आज झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी संगणकीय सादरीकरण करून शहरातील झोपडपट्ट्या, त्यामधील लोकसंख्येचे होणारे पुनर्वसन प्रकल्प इमारत याची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, झोपडपट्टीधारकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची कामगार नोंदणी करावी. 735 झोपड्यांमधून 3383 लोकसंख्या सध्या राहते. त्यांच्यासाठी वाहनतळासह अन्य सुविधा देऊन साडेतीन एकरात 11 इमारती बांधण्यात येतील.
386 चौरस फुटाची सदनिका त्यांना मोफत मिळणार आहे. सध्याच्या दरानुसार याची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारक नव्या वास्तूत आणि शहरात राहायला येतील. बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी