परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात कोचिंग क्लासेस आणि आरोपींच्या बँक खात्यांच्या चौकशीची खा. अनिल बोंडेंची मागणी
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणामागे ‘कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून एकत्र आलेले ‘रॅकेट’ असल्याचे सांगून गंभीर आरोप केले आहेत
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात खा. अनिल बोंडेंना वेगळाच संशय कोचिंग क्लासेस आणि आरोपींच्या बँक खात्यांच्या चौकशीची केली मागणी


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)

परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणामागे ‘कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून एकत्र आलेले ‘रॅकेट’ असल्याचे सांगून गंभीर आरोप केले आहेत. या माध्यमातून मुलींना जाळ्यात ओढले जात असून या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’ने सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. बोंडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, गेल्या काही वर्षांपासून अमरावती, परतवाडा, नेर, नांदगाव खंडेश्वर या भागात अनेक कोचिंग क्लासेस सुरू झाले. उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली येथे प्रवेश दिले जातात. मात्र, हे क्लासेस चालवणारे कोण आहेत, त्यांचे मूळ उद्देश काय आहेत, याची कोणतीही स्पष्ट माहिती समोर येत नाहीये. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.

या कोचिंग क्लासचे केवळ व्यावसायिक स्वरूप उरले नसून शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी केवळ पैसे घेऊन कोणालाही प्रवेश दिला जातो. अशा ठिकाणी काही संशयास्पद समाज माध्यम समूह तया केले जातात, ज्याच्या माध्यमातून आरोपी मुलींच्या संपर्कात येतात. जे तरूण कधीही शाळेत गेले नाहीत, ते देखील अशा क्लासेसमध्ये पैसे भरून सक्रिय आहेत, असा गंभीर दावा डॉ. बोंडे यांनी केला.

सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी विशेष तपास पथकाचे प्रमुख डॉ. शिवकुमार यांच्याकडे केली आहे. सर्व संशयास्पद कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासावे, या क्लासेसच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे, विद्यार्थ्यांची पात्रता आणि प्रवेशाच्या पद्धतीची कसून चौकशी व्हावी, सामान्य शिकवणी वर्गांमध्ये शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष असते, पण या मोठ्या कोचिंग हबमध्ये केवळ नफा कमावणे, हाच उद्देश असल्याने असे गैरप्रकार घडत असल्याचा संताप डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande