परभणी - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने दिली स्वावलंबनाची संधी
परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनांना मोठा प्रतिसाद मिळत असून, डिजिटल तंत्रज्ञानाचा व्या
परभणी - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने दिली स्वावलंबनाची संधी


परभणी, 16 एप्रिल, (हिं.स.)। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनांना मोठा प्रतिसाद मिळत असून, डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांमुळे या योजना अधिक प्रभावी ठरत आहेत.

महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे १,६७० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनांची कार्यवाही सुरू झाल्यापासून वर्षनिहाय फलनिष्पत्तीही लक्षणीय वाढ दर्शवित आहे.

आर्थिक वर्षनिहाय आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये ६४९ पात्रता प्रमाणपत्रे देण्यात आली असून २८ लाभार्थ्यांना लाभ मिळाला, तर व्याज परतावा शून्य होता. २०१८-१९ मध्ये १०,९२५ पात्रता प्रमाणपत्रे, ३,३६७ लाभार्थी आणि २.६० कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला. २०१९-२० मध्ये १९,६२५ पात्रता प्रमाणपत्रे, ११,८९६ लाभार्थी आणि २८.५३ कोटी रुपयांचा परतावा वितरित करण्यात आला.

२०२०-२१ मध्ये १४,६९६ पात्रता प्रमाणपत्रे, ८,३२५ लाभार्थी आणि ६३.५५ कोटी रुपये वितरित झाले. २०२१-२२ मध्ये १६,७९१ पात्रता प्रमाणपत्रे, १६,४८२ लाभार्थी आणि ११८.२९ कोटी रुपये देण्यात आले. २०२२-२३ मध्ये १८,६७२ पात्रता प्रमाणपत्रे, १५,८९५ लाभार्थी आणि १७८.८१ कोटी रुपयांचा व्याज परतावा झाला.

२०२३-२४ मध्ये ३७,५५७ पात्रता प्रमाणपत्रे, २४,४९१ लाभार्थी आणि ३०१.०२ कोटी रुपये वितरित करण्यात आले. २०२४-२५ मध्ये ३५,६०१ पात्रता प्रमाणपत्रे, ४६,७९२ लाभार्थी आणि ३८८.८८ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. तर २०२५-२६ मध्ये ३८,८४३ पात्रता प्रमाणपत्रे, ४९,९९२ लाभार्थी आणि ५८८.६९ कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला. एकूणच १,९३,३५९ पात्रता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, १,७७,२६८ लाभार्थ्यांना १,६७०.३७ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे योजनांविषयी अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळावी यासाठी महामंडळाने ‘स्मार्ट बॉट’ आणि व्हॉट्सअॅ प सेवा सुरू करून डिजिटल क्षेत्रात मोठा टप्पा गाठला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट बॉट हा २४x७ कार्यरत असून, लाभार्थ्यांना योजना, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, व्यवसाय निवड, प्रकल्प खर्च व आर्थिक नियोजन तसेच अर्ज स्थितीबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. आतापर्यंत १५,५०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

व्हॉट्सअॅप सेवेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित सर्व माहिती थेट मोबाईलवर मिळत आहे. एलओआय (Letter of Intent), क्लेम प्रक्रिया, मंजुरी (Sanction), व्याज परतावा जमा झाल्याची सूचना आदी माहिती टेम्पलेटच्या माध्यमातून दिली जाते. महामंडळाचा अधिकृत व्हॉट्सअॅतप क्रमांक ८९७६८५५९२१ असून, लाभार्थ्यांनी प्राप्त संदेशांना २४ तासांत प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रकरणाची स्थिती वेळोवेळी कळत राहील.

तसेच, महामंडळाने व्हॉट्सअॅ२प चॅनेल सुरू करून विविध उपक्रम, नवीन परिपत्रके, शासन निर्णय व महत्त्वाच्या घडामोडींची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची सोय केली आहे. या चॅनेलची लिंक महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, महामंडळाच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पनवेल येथे सिडकोकडून सुमारे १.५ एकर जागा मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार रु 1 रु प्रति चौ.मी. दराने मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत अलॉटमेंट पत्र प्राप्त झाले असून, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

प्रस्तावित जागेवर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बहुउद्देशीय मुख्यालय उभारण्याचे नियोजन असून, त्यामध्ये प्रशासकीय कार्यालय, लाभार्थी सहाय्यता केंद्र, प्रशिक्षण व कौशल्य विकास विभाग, निवासी प्रशिक्षण केंद्र, संशोधन सुविधा, डिजिटल सेवा केंद्र तसेच परिषद व मार्गदर्शन कक्ष उभारले जाणार आहेत. महामंडळाच्या या सर्व उपक्रमांमुळे कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान व सुलभ होण्यास मदत होणार असून, लाभार्थ्यांना स्वावलंबनाकडे नेणारा मार्ग अधिक बळकट होणार आहे. असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande