एसटीची १०% हंगामी भाडेवाढ; स्वच्छता अधिभारावरून प्रवाशांचा संताप
अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू केल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाच्या घटना घडल्या. मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होताच वाढले
दुष्काळात तेरावा! एसटीची १०% हंगामी भाडेवाढ; स्वच्छता अधिभारावरून प्रवाशांचा संताप


अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.)उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू केल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाच्या घटना घडल्या. मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होताच वाढलेल्या तिकीट दरासह प्रत्येक तिकिटामागे २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र यंदा भाडेवाढीसोबतच स्वच्छता अधिभाराची भर पडल्याने प्रवाशांच्या खिशाला अधिकच कात्री बसत आहे. विशेष म्हणजे, बसस्थानके व बसेस अस्वच्छ असल्याची तक्रार कायम असतानाही अधिभार आकारला जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

महिलांसाठी अर्ध्या तिकीटाची योजना कायम असली तरी वाढलेल्या दरांचा परिणाम त्यांनाही सहन करावा लागत आहे. दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाडे माफ असले तरी त्यांच्याकडूनही २ रुपयांचा स्वच्छता अधिभार घेतला जात असल्याने अनेक ठिकाणी वाहक आणि ज्येष्ठांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या.भाडेवाढीच्या पहिल्याच दिवशी एसटीचे सर्व्हर डाऊन झाल्याने यूपीआय व्यवहारात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम देण्याची वेळ आली आणि सुट्ट्या पैशांवरूनही वाद झाले. तिकीट मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.अमरावतीहून नागपूर, यवतमाळ, अकोला, परतवाडा आदी मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाढीव दराचा फटका बसला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ प्रवाशांसाठी ‘दुष्काळात तेरावा’ ठरत असून, प्रशासनाने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande