
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.) बालविवाह होऊ नयेत यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ६१ बालविवाह प्रशासनाने रोखले. जागृत नागरिकांचा सहभाग व यंत्रणेचा तात्काळ प्रतिसाद यामुळे बालविवाह रोखता आले.बालविवाह प्रतिबंध ही एक चळवळ होण्यासाठी सर्वसामान्यांचा प्रतिसाद व सक्रीय सहभाग आवश्यक आहे,असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ६१ बालविवाह रोखण्यात आले. तालुकानिहाय रोखलेल्या बालविवाहांची संख्या या प्रमाणे- छत्रपती संभाजीनगर-२५, पैठण-८, गंगापुर-८, वैजापूर-३,कन्नड-२, खुलताबाद-२, फुलंब्री-४, सोयगार-२, सिल्लोड-७ असे एकूण ६१ बालविवाह रोखण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी दिली. रोखलेल्या ६१ प्रकरणांपैकी ५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले तर २ प्रकरणी पिडीत बालिकांना बालगृहांमध्ये संरक्षण पुरविण्यात आले. अन्य ठिकाणी बालविवाह रोखून पालकांकडून लेखी हमी पत्र घेण्यात आले.
बालविवाह दंडनीय अपराध
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांमध्ये केवळ पालकांवरच नव्हे, तर विवाह सोहळा आयोजित करणारे, मध्यस्थ, नातेवाईक, मंडप-डेकोरेशन व्यावसायिक, बॅण्डपथक तसेच कार्यक्रमासाठी सुविधा पुरविणाऱ्या इतर संबंधितांवरही कायदेशीर करण्यात येते.
ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका महत्त्वाची
बालविवाह प्रतिबंधासाठी ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका महत्त्वाची आहे. या समितीत अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थानिक पदाधिकारी यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. गावपातळीवर अशा संशयास्पद विवाहांची माहिती मिळताच तात्काळ तपासणी करून आवश्यक तेथे हस्तक्षेप करण्यात येईल. या समितीमार्फत हा विवाह रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाते. याबाबत प्रत्येक गावांत बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अशाप्रकारे होणाऱ्या बालविवाहांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.
बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर परिणाम
बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर तसेच त्यांचे शिक्षण व भविष्यातील संधींवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे हा केवळ सामाजिक प्रश्न नाही, तर तो मुलींच्या संर्वांगीण भवितव्याशी निगडीत असून कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय साधत विविध विभाग एकत्रितपणे काम करीत आहेत.
आपणही रोखू शकता बालविवाह
आपणही बालविवाह निर्मूलन करण्यात आपले योगदान देऊ शकतात. आपल्या परिचयात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नजिकचे पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. बालविवाह लावण्यात सक्रीय सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते, असा इशाराही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी दिला आहे.
असा रोखला जातो बालविवाह
समाजातील सजग नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर बालविवाहाची माहिती दिल्यास ही तक्रार ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यातील चाईल्ड हेल्प लाईनला ही तक्रार जोडून दिली जाते. ही सेवा निःशुल्क आहे. या हेल्प लाईनवरुन समन्वय साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, संबधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून गठीत केलेले पथक प्रत्यक्ष घटनास्थळास भेट देते. पोलिसांच्या मदतीने बालविवाहास प्रतिबंध केला जातो. आवश्यकता भासल्यास पिडीत बालिकेस आश्रय दिला जातो. तिला व तिच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. बालिकेचे पुनर्वसन करण्याचीही उपाययोजना केली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis