
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. गेल्या सात दिवसांत ११२ पेक्षा अधिक संशयित आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ऑन-रेकॉर्ड गुन्हेगारांचे राउंडिंग अप करून तपासणी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वात शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान अवैध शस्त्र बाळगणारे, हद्दपार व तडीपार आरोपी, हिस्ट्रीशीटर आणि सराईत गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली. एकूण ३२ अधिकारी व १०१ अंमलदारांच्या पथकाने ५९ तडीपार गुन्हेगार, २७एमपीडीएतील आरोपी तसेच ११ ब्रेच ऑफ बॉण्ड प्रकरणातील गुन्हेगारांची तपासणी केली. आर्म अॅक्ट अंतर्गत चार गुन्हे नोंदविण्यात आले. दरम्यान, ६ ते १३ एप्रिल या कालावधीत नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवून मपोका कलम ५५ अंतर्गत १३ तर ५६/५७अंतर्गत ३० हद्दपार आरोपींची तपासणी केली. त्यापैकी आठ जण शहरात आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल केले. तसेच एमपीडीएअंतर्गत ९६ आरोपींवर कारवाई करत ८३ गुन्हे नोंदविण्यात आले. शिवाय जुगार प्रकरणात सात जणांविरुद्ध कारवाई करून दोन लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis