मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे उपचार झाले शक्य, बालिकेवरील दुहेरी शस्त्रक्रिया यशस्वी...!
परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील दोन वर्षांच्या बालिकेवर मणक्यातील गाठ व मेंदूशी संबंधित दुर्मिळ अशा दुहेरी शस्त्रक्रिया देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी त
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे उपचार झाले शक्य, बालिकेवरील दुहेरी शस्त्रक्रिया यशस्वी...!


परभणी, 16 एप्रिल (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यातील दोन वर्षांच्या बालिकेवर मणक्यातील गाठ व मेंदूशी संबंधित दुर्मिळ अशा दुहेरी शस्त्रक्रिया देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट यांच्या आर्थिक सहाय्यामुळे अल्प खर्चात पूर्ण करण्यात आली. यासाठी संबंधित कक्षाचे डॉ. बालाजी इप्पर यांचे विशेष सहाय्य लाभले.

सदर बालिकेला वारंवार उलट्या होणे, तोल जाणे व चालता न येणे अशी लक्षणे दिसून येत होती. विविध ठिकाणी उपचार करूनही समाधानकारक निदान न झाल्याने पालकांनी संबंधित रुग्णालयात संपर्क साधला. तपासणीअंती बालिकेच्या मानेच्या मणक्यामध्ये गाठ असल्याचे तसेच मेंदूतील दाब वाढल्याचे निदान झाले.

तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करत संभाव्य धोके नातेवाईकांना समजावून सांगितले. त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीने एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या शस्त्रक्रियेत मेंदूतील अतिरिक्त द्रव कमी करण्यासाठी नळी बसविण्यात आली, तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मणक्यातील गाठ काढण्यात आली. सुमारे सहा तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती सुधारली असून ती आता पूर्ववत चालणे व बोलणे करू लागली आहे.

या शस्त्रक्रियेत डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. अमिताभ कडतन, डॉ. अजय कुंडगीर, डॉ. श्रुती शहारे, डॉ. दीपाली कांबळे, डॉ. गजानन गयाळ, डॉ. विविध राजे, डॉ. श्रद्धा गबाळे व डॉ. विवेक वाघमारे यांनी मोलाचे योगदान दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande