
लातूर, 16 एप्रिल, (हिं.स.)। शहरात उत्साहात साजरी करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती मिरवणुकीदरम्यान प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी लातूर यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत जारी केलेल्या आदेशांची पायमल्ली केल्यामुळे पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे.
१४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील कॉर्नर चौक आणि पत्तेवार चौक परिसरातून निघालेल्या विविध मंडळांच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरला डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी लावली होती. पोलीस पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता, डीजेचा आवाज प्रशासनाने ठरवून दिलेल्या विहित डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. वारंवार सूचना देऊनही लोकसेवकांच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे आणि सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्यामुळे या मिरवणूक मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे चालक यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलिसांनी धीरज वाघमारे, शकील शेख, वाजिद शेख, रूपेश खादीवाले, महेश सूर्यवंशी, प्रेम गायकवाड, गजानन पवार, माधव मेघे आणि पृथ्वीराज देवनाळे यांच्यासह अन्य संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २९२ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, १३६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस हवालदार अनिल घोडके, रवींद्र काळे, अक्षय मंडलापुरे आणि निखील बुकटे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर आणि ध्वनीक्षेपक यंत्रणांबाबतचा तपास सुरू असून, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते, मात्र नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis