रायगड - वरसोलीत आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यशाळा; अभियानाची रूपरेषा स्पष्ट
रायगड, 16 एप्रिल, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी (ता.१६) वरसोली येथील सभागृहात पार पडली. कार्य
वरसोलीत आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यशाळा; अभियानाची रूपरेषा स्पष्ट


रायगड, 16 एप्रिल, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी (ता.१६) वरसोली येथील सभागृहात पार पडली.

कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेश्मा संकपाळ यांसह विविध तालुक्यांतील अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. प्राची नेहुलकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत, संपूर्ण गावाने एकत्र येऊन आरोग्यसंपन्न गाव उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला. यासाठी विविध स्तरांवर कृती दल स्थापन करून जनजागृती व उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हे अभियान मिशन मोडमध्ये राबवण्याचे आवाहन केले, तर मधुकर पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यावर भर देत कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.

अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सर्वांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या तसेच आरोग्य सेवांचा आढावाही घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande