
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून अशा सलग तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच एकत्रितपणे वितरित केले जाणार आहे.
सध्या उन्हाचा कडाका तीव्र झाला असून रेशन दुकानाबाहेर तासन् तास रांगेत उभे राहणे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कठीण होत होते. ही ओढाताण थांबवण्यासाठी आणि रेशन वितरण प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या योजनेचा मुख्य लाभ अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) या प्रवर्गातील शिधापत्रिका धारकांना मिळणार असून, यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पावसाळ्यापूर्वीच धान्याचा साठा करून ठेवण्याची मोठी सोय झाली आहे.
या नवीन नियमानुसार, अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड १०५ किलो (३ महिन्यांचे एकत्रित) धान्य मिळणार आहे, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला १५ किलो धान्य दिले जाईल. धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता जपण्यासाठी ‘ई-पॉस’ (e-PoS) मशीनवर अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता एकूण १८,१९६.८० टन धान्य मंजूर झाले असून, यात १०,८३३.४५ मेट्रिक टन तांदूळ आणि ७,३६३.३५ मेट्रिक टन गव्हाचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी