
चेन्नई, 16 एप्रिल (हिं.स.) चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला आहे. आपली मोहीम पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या फ्रँचायझीसाठी हा एक मोठा धक्का आहे. खलील आतापर्यंत चेन्नईसाठी सर्व पाच सामन्यांमध्ये खेळला आहे. १४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने आपल्या उजव्या हिपमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली होती.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खलील जखमी झाला. तो आपली चार षटकेही पूर्ण करू शकला नाही. साडेतीन षटकांनंतर त्याला मैदान सोडावे लागले, त्यानंतर गुर्जपनीत सिंगने एक चेंडू टाकून त्याचे षटक पूर्ण केले. त्या सामन्यात खलीलने सुनील नरेनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. केकेआरविरुद्धच्या डावाच्या १७ व्या षटकादरम्यान खलीलला दुखापत झाली. षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावत असताना, या वेगवान गोलंदाजाला त्याच्या उजव्या मांडीत अस्वस्थता जाणवली. त्याने खेळणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण वेदनांमुळे त्याला मध्येच थांबावे लागले आणि वैद्यकीय मदत घ्यावी लागली.
या आयपीएल हंगामात खलीलने पाच सामन्यांमध्ये दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाला नाही. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो फॉर्ममध्ये परतत असल्याचे दिसत होते. पण दुखापतीने त्याला मोठा धक्का दिला. सामन्याच्या निर्णायक टप्प्यावर ही दुखापत झाल्याने सीएसकेच्या चिंतेत भर पडली.
खलील अहमद आयपीएल २०२६ मधून बाहेर पडल्यामुळे, त्याच्या बदलीसाठी सीएसकेकडे दोन पर्याय आहेत. महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि रामकृष्ण घोष. रामकृष्ण घोष हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज आहे, त्यामुळे तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. २०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामात, घोष महाराष्ट्राचा सर्वात आश्वासक क्रिकेटपटू म्हणून उदयास आला आहे.
५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये, घोषने जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्यात. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका डावातील ही संघाची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच स्पर्धेत, घोषने मुंबईविरुद्ध २७ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावा केल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे