
नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.)केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेच्या (वाडा) जागतिक अंमली पदार्थ विरोधी अन्वेषण आणि तपास (ग्लोबल अँटी-डोपिंग इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन्स) नेटवर्कच्या (GAIIN) परिषदेच्या अंतिम सत्राच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. नैतिक आणि सुयोग्य पद्धतीने खेळण्याप्रती भारताची असलेली दृढ वचनबद्धता आणि उत्तेजक द्रव्य सेवनाविरुद्धच्या लढ्यात जागतिक सहकार्य करण्याविषयीची रूपरेषा यांनी त्यावेळी मांडली.
डोपिंगविरोधातील गुप्तचर आणि तपास कार्याचे जागतिक जाळे या महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सहकार्य बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना, मांडविया यांनी केले. तसेच,डोपिंगविरोधातील जागतिक लढ्यातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्याचे कार्य ही परिषद करते, असेही त्यांनी पुढे सांगितले.
भारताने केवळ नियमांचे पालन करण्यासाठीच नव्हे, तर खेळांच्या सचोटीप्रती असलेल्या खऱ्या वचनबद्धतेने सक्रिय सुधारणा हाती घेतल्या आहेत,असे डॉ.मांडविया यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायदा, 2022 ही एक मजबूत वैधानिक चौकट आहे, असे सांगत त्यांनी त्याकडे लक्ष वेधले आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी सुधारणा कायदा, 2025 भारताच्या नियमांना जागतिक मानकांशी सुसंगत आहे,असे नमूद केले. प्रतिबंधित पदार्थांचे सेवन किंवा तस्करी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कायद्याच्या तरतुदी लागू करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे, असे डॉ. मांडविया यावेळी म्हणाले.
पूर्वीचे प्रयत्न मुख्यत्वे प्रयोगशाळेतील चाचणी पद्धती आणि खेळाडूंनी नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित होते, परंतु आज डोपिंग हे वैयक्तिक गैरवर्तन न राहता, एक संघटित बहुराष्ट्रीय उद्योग बनला आहे, ज्यामुळे असे जाळे प्रभावीपणे उद्ध्वस्त करण्यासाठी जागतिक समन्वयाची गरज अधोरेखित होते, असे डॉ. मांडविया यांनी नमूद केले.
हे मॉडेल सहकार्यावर आधारित आहे. यात उत्तेजक-विरोधी व्यावसायिकांचे कौशल्य आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची क्षमता एकत्र काम करते, ज्याला युरोपोल आणि इंटरपोलसारख्या आंतरराष्ट्रीय भागीदार संस्थांचा पाठिंबा आहे,असे ते पुढे म्हणाले.
वाडा (WADA) कार्यशाळा आणि सध्याची परिषद यांसारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे आपल्या तपास क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि आपली उत्तेजक पदार्थ-विरोधी यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे,असे भारताचे महत्त्व जगात वाढत आहे असे सांगत डॉ .मांडविया म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश, दिशा आणि गती या दोन्हींसह एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून उदयास येत आहे”,असे त्यांनी भारताच्या क्रीडा महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार करत सांगितले.
खेळांमधील नैतिकतेवर भर देतांना, “खेळाडूंची मूल्ये ही क्रीडा उत्कृष्टतेच्या केंद्रस्थानी राहिली पाहिजेत,असे मांडवीय म्हणाले. खेळात शिस्त,सचोटी आणि चारित्र्य जोपासण्याची शक्ती आहे, परंतु वाढत्या स्पर्धात्मक दबावामुळे कधीकधी खेळाडू अनैतिक गोष्टींकडे ओढले जाऊ शकतात.” असे ते पुढे म्हणाले. म्हणूनच,खेळाच्या प्रत्येक स्तरावर निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि आदराला प्रोत्साहन देण्याची आवश्यक आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे