
-चेन्नई सुपर किंग्सची बीसीसीआयकडे तक्रार
चेन्नई, 16 एप्रिल, (हिं.स.) - आयपीएल २०२६ मध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान डीजेने वाजवलेले संगीत आणि केलेली टिप्पणी अनुचित होती, अशी तक्रार चेन्नई सुपर किंग्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे. सामन्यादरम्यान 'डोसा, इडली, सांबार, चटणी' हे व्हायरल गाणे वाजवण्यात आले, अशी तक्रार सीएसकेने दाखल केली आहे. गणा अप्पूने गायलेले हे गाणे, दक्षिण भारतीय रूढीवादी प्रतिमा दर्शवण्यासाठी सोशल मीडियावर अनेकदा वापरले जाते.
सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक कासी विश्वनाथन यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, डीजे सहसा यजमान संघाला पाठिंबा देतात, पण चिन्नास्वामी स्टेडियममधील परिस्थिती वेगळी होती. आमच्या क्रिकेटपटूंविरुद्ध काही टिप्पणी करण्यात आली, म्हणूनच आम्ही बीसीसीआयला पत्र लिहिले. ते पुढे म्हणाले, विरोधी क्रिकेटपटूंचा अपमान करणे हे डीजेचे काम नाही.
हे गाणे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील जुन्या प्रतिस्पर्धेशी देखील जोडले गेले आहे. चाहते अनेकदा सोशल मीडियावर याचा वापर करतात. गेल्या वर्षी, जितेश शर्मा हे गाणे गात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या घटनेनंतर, डीजे विरोधी क्रिकेटपटू किंवा चाहत्यांना लक्ष्य करणार नाहीत याची खात्री करण्यासाठी सीएसके व्यवस्थापनाने अधिक कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याची माहिती आहे.
या प्रकरणी कासी विश्वनाथन म्हणाले, जितेशच्या घटनेनंतर, बऱ्याच काळापासून याची पुनरावृत्ती झालेली नाही. विरोधी क्रिकेटपटूंवरर टिप्पणी करणे हे डीजेचे काम नाही. शिवाय, आम्हाला मोठ्या संख्येने पाठिंबा देणारा एक मजबूत चाहता वर्ग लाभला आहे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
सीएसके संघ व्यवस्थापनाने केवळ गाण्यांवरच नव्हे, तर सामन्यादरम्यान क्रिकेटपटू बाद होत असताना डीजेने केलेल्या टिप्पणीवरही आक्षेप घेतला. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी डीजे नसतात. या प्रकरणी बीसीसीआय काय कारवाई करते हे पाहणे बाकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे