
मुंबई, 16 एप्रिल, (हिं.स.)। आरे मेट्रो स्थानकाजवळील पादचारी पुलाबाबत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत, सदर पूल येत्या १५ ते २० दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदार अतुल भातखळकर यांना दिले.
हा पूल बांधून बराच कालावधी लोटूनही तो अद्याप नागरिकांसाठी खुला न झाल्याबाबत आमदार भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. यावर अग्निशमन दलाचे आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) प्रलंबित असल्यामुळे पूल सुरू करण्यात आलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, या पुलावर उद्वाहन (लिफ्ट) सुविधा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधत नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ उद्वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनांना अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली.
यावेळी आमदार भातखळकर म्हणाले की, “नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला पूल तातडीने खुला होणे आवश्यक आहे. अन्यथा, आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यात येईल.” या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करून पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर