
रत्नागिरी, 16 एप्रिल, (हिं. स.) : प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयाकडे रुग्णांना बाळंतपणासाठी पाठविणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यासाठी भरारी पथक ठेवा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या 2 वर्षांपूर्वीपेक्षा सध्याचे काम चांगले आहे. गुढघारोपणासारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. ही कौतुकाची बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयाला फायदा झाला असून, १४५ डॉक्टर्स काम करत आहेत. २ कॉर्डिअॅक आणि 12 सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्यावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री सामंत म्हणाले, समिती सदस्यांनी रुग्णांशी बोलून त्यांच्या अडीअडचणी समजून त्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितल्या पाहिजेत. महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत असतात का, रुग्णांच्या अडचणी रुग्णांसाठीच्या सुविधा याविषयीदेखील समिती सदस्यांनी देखरेख केली पाहिजे. गरीब, गरजू रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार व्हायला हवेत. जर कोणी खासगी रुग्णालयाकडे रुग्ण पाठवत असतील, तर ते तपासा. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करा. रुग्ण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घ्या. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थीदेखील जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत.
बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय (संनियंत्रण व सल्लागार) समिती सदस्य, जि. प. सदस्य हर्षदा गावडे, श्रद्धा मोरे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी