आयपीएल 2026 : बंगळुरुची लखनऊवर 5 विकेट्सने मात, संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी
बंगळुरु, 16 एप्रिल (हिं.स.)रसिक सलाम आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पाच विकेट्स राखून पराभव केला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या
विराट कोहली


बंगळुरु, 16 एप्रिल (हिं.स.)रसिक सलाम आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पाच विकेट्स राखून पराभव केला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लखनऊ २० षटकांत १० विकेट्स गमावून केवळ १४६ धावाच करू शकला. आरसीबीने १५.१ षटकांत ५ विकेट्स गमावून १४९ धावा केल्या आणि सामना जिंकला.

या विजयासह, आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाचपैकी चार सामने जिंकून, आरसीबीकडे आठ गुण आणि +१.५०३ चा नेट रन रेट आहे. दरम्यान, लखनौ संघ चार गुण आणि -०.८०४ च्या नेट रन रेटसह सातव्या स्थानावर आहे.

आरसीबीने फिल सॉल्टला दुसऱ्या षटकांतच गमावले होते. त्यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूंमध्ये ५७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पडिक्कल ११ चेंडूंमध्ये १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर कोहलीने डावाची सूत्रे पुन्हा हाती घेतली. कोहलीने एक षटकार आणि सहा चौकारांसह ३४ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदारने १३ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या, तर जितेश शर्माने २३ धावा केल्या.संघाने १२२ धावांवर आपली पाचवी विकेट गमावली. त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी १४ धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. प्रिन्स यादवने विरोधी संघाकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर आवेश खानने दोन विकेट्स घेतल्या.

यापूर्वी, लखनऊच्या डावाची सुरुवात सावधपणे झाली होती. एडन मार्कराम आणि मिचेल मार्श या जोडीने पहिल्या चार षटकांत ३२ धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, वेगवान सुरुवातीनंतर मार्कराम अवघ्या १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत क्रीजवर आला, पण दुर्दैवाने, त्याच्या डावातील तिसऱ्याच चेंडूवर तो जखमी झाला आणि त्याला दुखापतग्रस्त होऊन निवृत्त व्हावे लागले. दुसरीकडे, मार्शने सूत्रे हाती घेतली आणि दोन षटकार व तीन चौकारांसह ३२ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या, पण तोही फार काळ टिकू शकला नाही.

मधली फळी पूर्णपणे कोसळली आणि ११८ धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच संघाने पाच गडी गमावले. दरम्यान, पंत पुन्हा फलंदाजीसाठी परतला, पण १६.५ व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तो फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने सहा चेंडूंमध्ये केवळ एक धाव काढली. भुवनेश्वर कुमारने डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि १९व्या षटकाच्या सलग चेंडूंवर जॉर्ज लिंडे (७) आणि मोहम्मद शमी (०) यांना बाद केले. पण त्याची हॅट-ट्रिक हुकली. आयुष बडोनीने २४ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ३८ धावा केल्या, तर मुकुल चौधरीने २८ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांसह ३९ धावांची उपयुक्त खेळी केली.

रसिख सलाम दारने आपल्या गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत २४ धावांत चार विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारनेही तीन फंलदाजांना बाद केले तर कृणाल पांड्याने दोन आणि जोश हेझलवूडने एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande