
नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.)। नवी दिल्लीत 13 एप्रिल 2026 रोजी सुरू झालेली द्विवार्षिक लष्कर कमांडर्स परिषदेचा (एसीसी) समारोप 16 एप्रिल 2026 रोजी झाला. लष्करप्रमुख (सीओएएस) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांसह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. नौदलप्रमुख यांच्याव्यतिरिक्त कॅबिनेट सचिव, संरक्षण प्रमुख, संरक्षण सचिव आणि एनएसएबीचे अध्यक्ष यांच्यासह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिषदेत सहभागी झालेल्यांना संबोधित केले. 'भविष्यासाठी सज्ज दल' (फ्युचर रेडी फोर्स) बनण्याच्या दूरदृष्टीनुसार, भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी चे वर्ष म्हणून घोषित केले आहे.
या परिषदेत लष्कराचे आधुनिकीकरण, लढाऊ कारवायांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सैद्धांतिक आणि प्रशिक्षणाच्या गरजा, तसेच कार्यात्मक सज्जता वाढवण्यासाठी आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे आणि जागतिक स्तरावरील सध्याच्या कार्यप्रणालीच्या गतिशीलतेनुसार, वरिष्ठ लष्करी नेतृत्वाने मानवरहित हवाई प्रणाली (यूएएस) आणि प्रति-मानवरहित हवाई प्रणाली (C-UAS) यांच्या वापरासह कार्यात्मक क्षमतांच्या आवश्यकतांवरही लक्ष केंद्रित केले.
परिषदेत उपस्थित मान्यवर वक्त्यांनी बदलत्या भू-राजकीय परिस्थितीवर तसेच जागतिक, प्रादेशिक आणि अंतर्गत सुरक्षा आव्हानांवर प्रकाश टाकला. जागतिक संघर्षांमधून मिळालेल्या धड्यांचा विशेष संदर्भ देत, वक्त्यांनी भारताच्या सामरिक आणि सुरक्षा हितांच्या हमीपूर्ण संरक्षणासाठी कठोर शक्तीच्या गरजेवर भर दिला. तसेच, गुंतागुंतीच्या सुरक्षा आव्हानांना समन्वित राष्ट्रीय प्रतिसाद देण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समन्वय, नागरी आणि लष्करी संस्थांमधील वाढीव समन्वय आणि सर्वांगीण राष्ट्र दृष्टिकोनावर जोर दिला. सध्याच्या पुरवठा साखळीतील संकटाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मजबूत करण्यासाठी आणि दीर्घकालीन सामरिक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी स्वदेशी उत्पादन क्षमतांना गती देण्याची तातडीची गरज या परिषदेत अधोरेखित करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule