
नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.) : टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील एचआर मॅनेजर निदा खान हिने अटक टाळण्यासाठी नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 21 दिवसांपासून फरार आहे. दरम्यान, तिने वकिलांमार्फत कायदेशीर हालचाली सुरू करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे प्रकरण नाशिकसह देशभरात चर्चेचा विषय ठरले असून, कंपनीतील हिंदू तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलीस तपासानुसार, काही तरुणींना मानसिक दबावाखाली ठेवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप निदा खानवर आहे.
या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे नाशिक शहर पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. पोलिसांची पथके भिवंडी, मुंबई, पुणे आणि नाशिकमधील विविध संभाव्य ठिकाणी तिचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
दरम्यान, निदा खान गरोदर असल्याची माहितीही समोर आली असून, त्याच कारणावरून तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याचे सांगितले जात आहे.
तपासात तिची भूमिका कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांच्यावर प्रभाव टाकणे आणि कथित धर्मांतर प्रक्रियेत सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणामागे मोठे नेटवर्क असण्याची शक्यता तपास यंत्रणा वर्तवत आहे.
निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV