
नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्तीबाबत संसदेत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आणि काल मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती, असे त्यांनी नमूद केले. या दुरुस्तीबाबत असलेले सर्व गैरसमज तर्कशुद्ध उत्तरे देऊन दूर करण्यात आले असून, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन केले आहे, असे त्यांनी सांगितले. जिथे अपुरी माहिती होती तिथे आवश्यक माहितीही सर्व सदस्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून विरोधकांच्या शंका दूर होतील असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास चार दशकांपासून राजकीय चर्चा होत असल्याकडे लक्ष वेधून घेत पंतप्रधानांनी सांगितले की आता देशाच्या लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही निर्णयप्रक्रियेत महिलांचे कमी प्रतिनिधित्व असणे योग्य नाही आणि ते दुरुस्त करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
लोकसभेत लवकरच मतदान अपेक्षित असून सर्व राजकीय पक्षांना विचारपूर्वक आणि संवेदनशील निर्णय घेऊन महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. देशातील महिलांच्या वतीने आवाहन करत त्यांनी सर्व खासदारांना विनंती केली की नारी शक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य होऊ नये, याची खात्री करावी. त्यांनी नमूद केले की कोट्यवधी महिला संसदेकडे, तिच्या उद्देशांकडे आणि निर्णयांकडे अपेक्षेने पाहत आहेत. पंतप्रधानांनी खासदारांना आपापल्या कुटुंबातील आई, बहिणी, मुली आणि पत्नी यांना डोळ्यासमोर आणून निर्णय घेताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा, असे आवाहन केले.
या दुरुस्ती विधेयकाचे त्यांनी देशातील महिलांची सेवा करण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची एक महत्त्वाची संधी असे वर्णन केले. सदस्यांनी त्यांना नव्या संधींपासून वंचित ठेवू नये, असे आवाहन केले. हे दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाल्यास नारी शक्ती तसेच देशाची लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
याला ऐतिहासिक क्षण म्हणत त्यांनी सर्व सदस्यांना एकत्र येऊन भारताच्या लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व देऊन नवा इतिहास घडविण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule