
बंगळूर, 17 एप्रिल (हिं.स.)। कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील देवापूरजवळ कार आणि खासगी बस यांच्यात झालेल्या धडकेत एका कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार यादगिरीहून रायचूरकडे जात होती, तर बस बेंगळुरूहून कलबुर्गीकडे जात होती. धडकेनंतर कार आणि बस दोन्हींना आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
मृतांची ओळख रायचूर जिल्ह्यातील सिरवार येथील नगरसेवक कृष्णा नायक (५०), त्यांची पत्नी अनंत कला (४५), शरणप्पा (३६), त्यांची पत्नी निसर्गा (३०), मुलगा सिद्धार्थ (३) आणि शशिकला (३०) अशी झाली आहे. हे सर्व कारमधील प्रवासी होते. अमावस्येनिमित्त वेणुगोपाल मंदिराचे दर्शन करून परत येताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कारमधील अथ्विक (५) आणि एक वर्षांची श्रीनिधी हे चमत्कारिकरित्या बचावले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यादगिरी येथील यिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यादगिरीचे पोलीस अधीक्षक पृथ्विक शंकर यांनी सांगितले की, कारमध्ये एकाच कुटुंबातील आठ जण होते, त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुले जखमी झाली. कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. धडकेनंतर बसने कारला सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेले. या प्रकरणी सुरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule