
आरोपींमध्ये उपव्यवस्थापक व लिपीकाचा समावेश
नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महावितरणच्या दोन जणांना तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अटक केली आहे. प्रलंबित मेडिकल बिल मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. गणेश डोरले आणि सुमीत रेवतकर अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे हिंगणा एमएसईबी कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात उजवा हात कापला गेला होता. आरोपी लोकसेवक गणेश नथुजी डोरले (उप व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, सातगाव बुटीबोरी) आणि सुमित रेवतकर (कनिष्ठ लिपिक, वर्ग-3) यांनी 2.50 लाख रुपयांची लाच मागितली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता दोन्ही आरोपी लोकसेवकांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ठरल्यानुसार आज, गुरुवारी (2 एप्रिल रोजी) गणेश डोरले लाच घेण्यासाठी तक्रारदाराच्या घरी पोहचले असता सापळा कारवाईदरम्यान हॉलमध्ये 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक केली. तर कनिष्ठ लिपिक सुमित रेवतकर यांनी पडताळणीदरम्यान लाच मागितल्याने त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी