
जळगाव , 02 एप्रिल (हिं.स.) सायबर ठगांकडून मोफत टूर पॅकेजचे आमिष दाखवून एका वित्तीय सल्लागाराची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे. नामांकित कंपनीच्या नावाने फोन करून सहलीचे आकर्षक स्वप्न दाखवत संबंधित व्यक्तीकडून तब्बल १ लाख ७० हजार रुपये उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वित्तीय सल्लागार राहुल गौतमराव साळुंखे यांना एप्रिल २०२५ मध्ये एका कंपनीकडून फोन करून तुम्ही कार कंपनीचे कॉम्प्लिमेंटरी टूर पॅकेज जिंकले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना सहकुटुंब शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावून सात दिवसांच्या आकर्षक सहलीचे आमिष दाखवण्यात आले. प्रतिनिधींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साळुंखे यांनी आपल्या क्रेडिट कार्डवरून मोठी रक्कम भरली. मात्र, नंतर ट्रिपचे नियोजन करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधला असता वारंवार टाळाटाळ करण्यात आली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या टूर पॅकेज स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले असून मोफत भेटवस्तू किंवा सहलीचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर