
बीड, 02 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने परळीमध्ये मोठी कारवाई करत एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या बालकाच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून यात एक स्कुटी आणि दोन मोटारसायकलचा समावेश आहे. सखोल चौकशीत या विधीसंघर्ष बालकाने परळी परिसरातूनच या गाड्या चोरल्याची कबुली दिली.
या यशस्वी कामगिरीमुळे परळी आणि संभाजीनगर पोलीस ठाण्यातील भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत दाखल असलेले दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पूर्ण केली असून जप्त केलेला सर्व मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis