
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : नवी दिल्ली येथे 30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान आयोजित साहित्योत्सवात मेळघाटातील कोरकू बोलीभाषेचे अभ्यासक व संशोधक रामगोपाल भिलावेकर (धारणी) यांना मौखिक महाकाव्य विषयावरील चर्चेसाठी पॅनलिस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी होणाऱ्या या चर्चेत त्यांच्या सहभागामुळे कोरकू भाषेला थेट राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले असून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित या साहित्योत्सवात विविध भाषा, आदिवासी बोली, परंपरा, भाषाविज्ञान, मौखिक आणि अलिखित परंपरा, तसेच गीत-संगीत, नृत्य व कलांचा व्यापक आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शने आणि कला प्रदर्शनांचा समावेश आहे.
धारणी तालुक्यातील पाथरपूर गावातील रामगोपाल रामलाल भिलावेकर यांनी उच्च शिक्षण घेत असतानाच आणि नोकरी करत असतानाही मेळघाटातील कोरकू साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी या संस्कृतीतील वैज्ञानिक पैलूंचाही शोध घेतला आहे.रामगोपाल भिलावेकर यांच्या सहभागामुळे कोरकू संस्कृती आणि मेळघाटातील परंपरा राष्ट्रीय पातळीवर पोहोचत असून हा संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी