अमरावतीच्या क्रीडा संकुलाची जागा महापालिकेला विनामूल्य देणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमरावतीलगत नवसारी येथील १६,७०८ चौ. मीटर जागेवर विकसित क्रीडा संकुलाची जागा अमरावती महानगरपालिकेला विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्
नवसारी क्रीडा संकुल अधिकृतपणे मनपाच्या ताब्यात शासनाने जागा दिली विनामूल्य -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब


अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमरावतीलगत नवसारी येथील १६,७०८ चौ. मीटर जागेवर विकसित क्रीडा संकुलाची जागा अमरावती महानगरपालिकेला विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय शक्य झाला. संबंधित जागा विकास योजनेत ‘खेळाचे मैदान’ म्हणून आरक्षित होती आणि तिचा आगाऊ ताबा महापालिकेला देण्यात आला होता.

मात्र, महापालिकेने पूर्वपरवानगीशिवाय तृतीय पक्षांसोबत करार करून या ठिकाणी क्रीडा संकुल उभारले आणि सुमारे १,८७८.८० चौ. मीटर क्षेत्रावर व्यावसायिक वापर सुरू केला होता. या नियमभंगामुळे शासनाने अकृषिक दराने १०.९० कोटी रुपये आणि २०११ पासूनच्या व्यावसायिक वापरावर ३.५६ कोटी रुपये व्याज, अशा एकूण १४.४६ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, अमरावती महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत मर्यादित असून सुमारे ३५० कोटी रुपयांचे दायित्व प्रलंबित आहे. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्तांनी शासनाला कळवले होते.

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी पाठपुरावा करून हा निर्णय मार्गी लावला. त्यांनी सांगितले की, अमरावती शहरासाठी क्रीडांगणाची मोठी गरज होती. या ठिकाणाहून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यामुळे सामाजिक हित आणि खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन ही जागा महापालिकेला विनामूल्य देण्यात आली आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande