अमरावतीत आयपीएल सट्ट्यावर पोलिसांची धाड; तिघांना अटक
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम राजुरा येथे आयपीएल सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रजिस्टर आणि इतर सट्टा साहित्यांसह एकूण ५ ल
ऑनलाईन आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड 3 आरोपींना अटक, 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम राजुरा येथे आयपीएल सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रजिस्टर आणि इतर सट्टा साहित्यांसह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश सुरेश पाटकर (वय ३४, रा. अंबा कॉलनी, शिव रेसिडेन्सी), अभिजीत अरुण पेटकर (वय ३६, रा. आमनेर, ता. वरुड) आणि सागर रामकृष्ण निबंरते (वय ३०, रा. सावता मैदान, जुनी वस्ती, बडनेरा) यांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महेश पाटकर हा काही साथीदारांसह गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यावर ऑनलाइन बेटिंग अॅप आणि मोबाईलच्या माध्यमातून सट्टा लावत होता. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी मोबाईल आणि लॅपटॉपच्या सहाय्याने सट्टा खेळताना आढळले.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये क्रिकेट सट्ट्याचे व्यवहार आणि रेकॉर्डिंग आढळले. तसेच आरोपींनी यवतमाळ येथील रितेश जोशी यांच्या नावावर घेतलेल्या आयडीचा गैरवापर करून लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सट्ट्याची रक्कम पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल यांच्याकडे दिली जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींकडून ९ मोबाईल (३.६० लाख रुपये) आणि २ लॅपटॉप (२ लाख रुपये) असा एकूण ५.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande