
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.)।औसा तालुक्यातील खरोसा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेनं आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या घराशेजारील विहिरीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला गेला आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली. सोमवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या.
सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis