
परभणी, 21 एप्रिल, (हिं.स.)। मानवत येथील शिवसेना शहर प्रमुख किशोर वचनकर यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर करून कार्यकर्ते माधव उद्धवराव लाड यांची एनसीएमसी कार्ड मशीन व सेंटर लॉगिन देण्याच्या नावाखाली ३० हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
निवेदनानुसार, मानवत शहरातील सुशिक्षित बेरोजगार नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड मशीन व सेंटर लॉगिन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी ३० हजार रूपयांची ऑनलाइन रक्कम एचजेआर एंटरप्रजेस या कंपनीच्या खात्यावर जमा केल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पेमेंटची पावतीही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. जवळपास दोन महिने उलटूनही कार्ड मशीन व लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत होता, मात्र नंतर संबंधितांनी फोन उचलणे बंद केले. विविध मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिवाय, निवेदनात ई-मेलद्वारे लॉगिन डिटेल्स पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून, त्याचे स्क्रीनशॉटही जोडण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात मशीन व सेंटर सुरू न झाल्याने फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी तसेच एनसीएमसी कार्ड मशीन व लॉगिन त्वरित उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
__________
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis