
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : भुसावळ विभागातील पारस–गायगाव–अकोला दरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे गुरुवार, 23 एप्रिल रोजी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून चार मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दोन एक्सप्रेस गाड्या सुमारे दोन तास उशिराने धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 11121 भुसावळ–वर्धा मेमू, 61902 बडनेरा–भुसावळ मेमू, 61109 भुसावळ–बडनेरा मेमू आणि 19922 वर्धा–भुसावळ मेमू या चारही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच, गाडी क्रमांक 20820 ओखा–पुरी एक्सप्रेस शेगाव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान सुमारे 2 तास 25 मिनिटे उशिराने धावेल. याशिवाय गाडी क्रमांक 11040 गोंदिया–कोल्हापूर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे 2 तास 20 मिनिटे उशिराने धावणार आहे. या दोन्ही गाड्या काही काळासाठी रोखून ठेवण्यात येणार असल्याने त्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गुरुवारी शेगाव वारी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना या बदलांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच या मार्गावर गाड्यांची संख्या मर्यादित असताना, मेमू गाड्या रद्द झाल्याने आणि काही एक्सप्रेस उशिराने धावणार असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागू शकतो. विशेषतः सूरत एक्सप्रेस या दिवशी नसल्याने प्रवाशांची गैरसोय अधिक वाढण्याची शक्यता आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी