परभणी - भाजयुमोचा महावितरण कार्यालयात ठिय्या
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। परभणी शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या समस्येविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नगरसेवक अद्वैत पार्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
अ

शहरातील विविध भागांमध्ये दिवसातून तब्बल 10 ते 12 वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. सध्या नांदेड येथील विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही मोठा अडथळा निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेत काही डीपीवरील वीजभार कमी करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे काही प्रमाणात परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले.

या आंदोलनात नगरसेवक अद्वैत पार्डीकर यांच्यासह शुभम थोरात, अंगद शिंदे, पवन शिंदे, रोहन कहात, गौरव जोशी, राहुल उबाले तसेच मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि भाजयुमोचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande