१९४ मुक्या प्राण्यांसाठी लागले कूलर; 'वसा' संस्थेकडून गुरांची व्यवस्था
अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या, आजारी आणि अपघातग्रस्त मुक्या प्राण्यांची सेवा करणाऱ्या वसा संस्थेने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता दस्तूरनगर येथील श्री गोरक्षण संस्थेच्या माल
१९४ मुक्या प्राण्यांसाठी लागले कूलर उन्हाच्या झळांपासून दिलासा, 'वसा' संस्थेकडून गुरांची व्यवस्था


अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यातील रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या, आजारी आणि अपघातग्रस्त मुक्या प्राण्यांची सेवा करणाऱ्या वसा संस्थेने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता दस्तूरनगर येथील श्री गोरक्षण संस्थेच्या मालकीच्या जागेवर श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल आणि वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १९४ प्राण्यांसाठी संस्थेने कूलरची व्यवस्था केली आहे. या रेस्क्यू सेंटरमध्ये सध्या अंध, अपंग आणि वृद्ध, अशा २०० च्या जवळपास प्राण्यांचा सांभाळ केला जात आहे.

वाढत्या तापमानामुळे या प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी ‘वसा’ने सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अचलपूर येथील तीर्थंकर युवा मंडळ आणि सकल जैन समाज यांनी १० कूलर दान केले आहेत. तसेच शहरातील इतर प्राणीप्रेमींनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. प्राण्यांना ‘हीट स्ट्रोक’पासून वाचविण्यासाठी येथे विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्राण्यांना वेळोवेळी अंघोळ घातली जाते. खाण्यापिण्यातही बदल करण्यात आला असून, श्वान आणि मांजरींना आठवड्यातून एकदा आईस्क्रीम दिले जाते. तर मोठ्या प्राण्यांना टरबूज, काकडी, पालक आणि कोबी यासारखी थंड फळे व भाज्या दिल्या जात आहेत. २२ कर्मचाऱ्यांची टीम या प्राण्यांच्या अहोरात्र सेवेसाठी तैनात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande