अमरावती : उष्णतेची लाट तीव्र; तिवसात रुग्णसंख्या वाढून आरोग्य यंत्रणेवर ताण
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।तिवसा तालुक्यात वाढत्या उकाड्याचा परिणाम आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत असून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने गावखेड्यातील नागरिक उपचारासाठी शहराकडे ध
उष्णतेची लाट तीव्र; तिवसात रुग्णसंख्या वाढून आरोग्य यंत्रणेवर ताण


अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)।तिवसा तालुक्यात वाढत्या उकाड्याचा परिणाम आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत असून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने गावखेड्यातील नागरिक उपचारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्ण ओपीडीमध्ये नोंदवले जात असून त्यापैकी सुमारे ५० ते १०० रुग्णांना सलाईन देण्याची गरज भासत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.

उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, पातळ जुलाब, हिवताप, सर्दी-खोकला आदी तक्रारींनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या तापमानाचा परिणाम हृदयविकारांवरही होत असून छातीत दुखण्याच्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. सोमवारी काही रुग्णांना छातीत दुखण्याच्या तक्रारीवर उपचार देऊन सलाईन लावण्यात आले.ग्रामीण रुग्णालयात सकाळच्या सत्रातच ३० हून अधिक रुग्णांना सलाईन देण्यात येत असून दिवसभरात ही संख्या ५० च्या पुढे जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही शेकडो रुग्ण उपचारासाठी गर्दी करत असल्याने तेथेही ताण वाढला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सातत्याने सेवा देत असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचा ताण जाणवत आहे.दरम्यान, औषधांच्या तुटवड्याची समस्या देखील समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयाकडून मिळणारा औषधांचा पुरवठा अपुरा ठरत असल्याने काही वेळा रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार आहे. यामुळे रुग्णांना खासगी औषधालयांकडे वळावे लागत आहे.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश तलमले यांनी नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणे, तसेच हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.एकूणच, वाढत्या उष्णतेमुळे तिवसा तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेतल्यास या उष्णतेच्या लाटेचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande