
अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा येथे उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने सोशल मीडियावर बनवलेल्या रील्समध्ये दिसणाऱ्या थार गाडीबाबत आता कार मालकांच्या कुटुंबाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
परतवाडा पोलिसांनी या संदर्भात कार मालक राजेश प्रजापती आणि त्यांचे पुत्र आर्यन प्रजापती यांची प्राथमिक चौकशी केली. चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वाचे तांत्रिक पुरावे लागले आहेत. आरोपी अयान अहमदच्या ऐशोआरामाच्या जीवनशैलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये तो महागड्या वस्तूंसह आलिशान थार गाडीत फिरताना दिसतो. तसेच त्याच्या हातात पिस्तूल आणि गाडीत अनेक आयफोन असल्याचेही दिसून आले आहे. एका रीलमध्ये “ये जरूर कुछ बड़ा करेगा.. क्योंकि इसे जिंदगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है,” असा संवाद वापरलेला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित थार गाडी कोणाची, याबाबत चर्चा रंगली होती. यावर स्पष्टीकरण देताना आर्यन प्रजापती यांनी सांगितले की, “आरोपी अयान अहमदने फक्त रील्स बनवण्यासाठी माझ्याकडून गाडी मागितली होती. मोबाईल खरेदीच्या ओळखीमुळे मी त्याला गाडी दिली. त्याच्या कोणत्याही गैरकृत्याशी आमचा काहीही संबंध नाही.”
तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की, व्हिडिओमध्ये दिसणारी गन ही शेतीत वापरासाठी असलेली आहे. “या घटनेमुळे आमच्या कुटुंबावर संशय घेतला गेला आणि आम्ही मानसिक तणावात होतो,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी