
नाशिक, 26 एप्रिल, (हिं.स.)। शहरात उन्हाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून कमालीची वाढली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शहरात आगीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. शहरात गेल्या आठवड्यात तीसहून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये गवत, कचरा आणि झाडे जळण्याच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
या घटनांमागे निष्काळजीपणाबरोबरच विद्युत यंत्रणांची बिघाडलेली स्थितीही कारणीभूत आहे. नाशिक महानगरपालिका अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, या कालावधीत घडलेल्या २९ आर्गीपैकी तब्बल २३ आगी शॉर्टसर्किटमुळे लागल्या. शहरातील जुन्या वायरिंग, ओव्हरलोडेड लाइन्स आणि देखभालीअभावी निर्माण होणारे धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. आकडेवारीनुसार, गवत, कचरा, झाडे आणि लाकूड जळण्याच्या घटना सर्वाधिक नोंदल्या गेल्या असून, औद्योगिक, व्यावसायिक, वाहन आणि रहिवासी भागातही आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने बहुतांश २२ घटना या किरकोळ किंवा मध्यम स्वरूपाच्या असल्या, तरी ५ मोठ्या आगींनी धोक्याची घंटा वाजवली आहे. मनपा हद्दीतच २६ घटना घडल्याने शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सर्व घटनांमध्ये मिळून ५२ मालमत्तांचा समावेश असल्याने आर्थिक नुकसानही लक्षणीय असल्याचे दिसून येते. अग्निशमन दलासाठी मार्चपासून ते आतापर्यंत चांगलाच धावपळीचा जातो आहे.
आगीशिवाय झाडे कोसळणे, पक्षी-प्राण्यांची सुटका, व्यक्ती रेस्क्यू, मृतदेह बाहेर काढणे, मॉकड्रिल अशा विविध प्रकारच्या ५२ कॉल्सना प्रतिसाद देत दलाने सतत धावपळ केली. उन्हाळा वाढत असताना गवत-कचऱ्याल आग लागण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा टाळत विशेषतः वीज उपकरणे आणि गॅस वापरताना सतर्क राहण्याची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV