जळगावमध्ये धावत्या गाडीचे चाक निखळल्याने नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू
जळगाव, 29 एप्रिल (हिं.स.) | विवाह सोहळा आटोपून परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड गावानजीक महामार्गावर बुधवारी सकाळी धावत्या क्रूझर गाडीचे चाक निखळल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्
जळगावमध्ये धावत्या गाडीचे चाक निखळल्याने नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू


जळगाव, 29 एप्रिल (हिं.स.) | विवाह सोहळा आटोपून परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड गावानजीक महामार्गावर बुधवारी सकाळी धावत्या क्रूझर गाडीचे चाक निखळल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेत पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) असं गंभीर जखमी झालेल्यांची नाव आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

गुजरातमधील वापी येथे पूजा वागडकर या तरुणीचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर पूजा प्रथमच आपल्या सासरच्या मंडळींसह आणि नातेवाईकांसह माहेरी अकोल्याकडे क्रूझर गाडीने (एमएच ३० एझेड ४७१०) परतत होती. मात्र बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणगावातील वराड गावाजवळ गाडी वेगात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन जोरात धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाला.या भीषण अपघातात नववधू पूजासह तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढत तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande