
लातूर, 26 एप्रिल, (हिं.स.)। लातूर बसस्थानक परिसरात एका हृदयद्रावक घटनेत नशेच्या अवस्थेत असलेल्या महिलेसोबत तीन लहान मुलं आढळून आली. त्यातील सुमारे २५-३० दिवसांच्या तान्ह्या बालिकेची अवस्था चिंताजनक होती. या प्रसंगाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.
घटनेची माहिती मिळताच अजय चव्हाण यांनी तत्काळ पुढाकार घेत मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर मुस्तफा सय्यद, अमोल गेजगे घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती गंभीर असल्याने समाजकार्यकर्ते राहुल पाटील (अण्णा) व अमृत ढगे यांनीही तातडीने धाव घेतली.
सर्वांच्या समन्वयातून संबंधित महिला व तिन्ही मुलांना सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील काळजीसाठी बाल कल्याण समिती तसेच ‘सखी’ वन स्टॉप सेंटरच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे या चिमुकल्यांना सुरक्षित आश्रय मिळाला असून त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेत स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेमुळे संभाव्य अनर्थ टळला. संकटाच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या अशा संवेदनशील व्यक्तींमुळे समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे अधोरेखित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis